Kolhapur News: गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात (Halkarni Black Magic) आणि परिसरात हळद-कुंकू लावलेले लिंबू आढळल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना अंधश्रद्धेचा भाग आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला राजकीय डाव, यावरून गावात चर्चांना उधाण आले आहे. या गूढ प्रकारामुळे ग्रामपंचायत आणि स्थानिक राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

सार्वजनिक इमारतीत ‘अघोरी प्रकार’?
गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांनी प्रवेशद्वार, कोपरे, झाडाखाली अशा ठिकाणी हळद-कुंकवाने लिंबू ठेवलेले पाहिले. धार्मिक किंवा पूजा-संस्थांमध्ये सामान्यतः दिसणारी ही दृश्ये सरकारी कार्यालयात आढळल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या चर्चेचा फैलाव केवळ हलकर्णीपुरता मर्यादित न राहता आसपासच्या गावांपर्यंत झाला आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि कुतूहल आणखी वाढले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ट्विस्ट
ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने या प्रकाराला राजकीय रंग चढू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, ‘जादूटोणा’, ‘करणी’, ‘भानामती’ यांसारखे शब्द चर्चेत येऊ लागले आहेत. परिणामी, आगामी निवडणूक अधिक रंगतदार आणि गढूळ होण्याची चिन्हं दिसत आहेत.
सत्य अद्याप गूढच
या संपूर्ण घटनेमागील नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तथापि, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून घटनेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गावातील नागरिक आणि राजकीय वर्तुळात या प्रकरणाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, खऱ्या कारणांचा उलगडा लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







