सांगली : सांगली जिल्ह्यातील युवा कुस्तीगीर आणि कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज जनार्दन निकम (वय-30, रा. नागेवाडी, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या कुस्तीगीराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुरज निकम याला कुस्ती खेळताना सतत दुखापत होत असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो एका खोलीत दार बंद करून एकटाच बसला होता. मात्र, सायंकाळी पाचवाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी सुरजला बाहेरून आवाज देत होते.
मात्र, घरातून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेंव्हा सुरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ खाली घेऊन विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत घोषित केले.
कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता
पै. सूरजने २०१४ मध्ये झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय मिळवला होता. २०१८ साली त्याने उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या विरोधात उपांत्य सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर कुस्तीचा सराव करण्यासाठी धुमछडी आखाडा पंजाब येथे सुरज राहण्यास गेला.
देशाचा नावलौकीक मोठा करण्याचा सूरजचा मनसुबा
आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकीक मोठा करण्याचा सुराजाचा मनसुबा होता. तसेच माती आणि गादी अशा दोन्ही कुस्तीच्या प्रकारात त्याने प्राविण्य मिळवले होते. राष्ट्रीय सुवर्णपदक बिजेता मल्ल, पै. जस्सापट्टी, पै. किरण भगत, पै. समाधान घोडके, पै. बाला रफिक यांच्यासोबत झालेल्या सूरजच्या कुस्त्या प्रत्येकाच्या स्मरणात राहण्यासारख्या झाल्या होत्या.