कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरात (Kolhapur Crime) देहविक्रीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलांनी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला सुधारगृहात घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्यायनी परिसरातील एका रिसॉर्टवर अश्लील नृत्य आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित सहा नृत्यांगनांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी कोर्टाने या महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्या सुधारगृहात होत्या. दरम्यान, त्यांनी वारंवार जामिनासाठी अर्ज दाखल केले, मात्र त्यांना जामीन मंजूर झाला नाही. या कारणामुळे मानसिक नैराश्यातून त्यांनी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या सर्व महिलांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, करवीर तालुक्यातील नंदगाव येथे आणखी एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम लावून दोन नृत्यांगनांकडून अश्लील नृत्य करवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत दोन नृत्यांगनांसह सहा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नंदगाव येथील गायरान परिसरात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून परजिल्ह्यातील दोन कुटुंबे स्थायिक झाली आहेत. त्यापैकी एका कुटुंबाने बारशाच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून दोन नृत्यांगनांसोबत काही तरुणांनी गाण्याच्या तालावर अश्लील नृत्य केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. स्थानिक तरुणांनी या प्रकाराला विरोध दर्शवून घटनास्थळी मोर्चा वळवला. इस्पूर्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्दसर शेख यांनी तत्काळ कारवाई करत दोन नृत्यांगनांसह सहा जणांना ताब्यात घेतले. या सलग दोन घटनांमुळे करवीर तालुका हादरला असून, पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.







