पुणे: पुणे बाजार समितीच्या (Pune Crime) गुलटेकडी मार्केटयार्डात भाजीपाल्याच्या (Pune News) गाळ्याच्या आडून गुटख्याची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत तब्बल 66 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून करण्यात आली असून, या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्डातील तरकारी विभागात भाजीपाला विक्रीच्या आडून गुटखा विक्री केली जात होती. पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी गस्त घालत असताना एका रिक्षाचालकाकडे गुटख्याच्या पुड्या सापडल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुटखा मार्केटयार्डातील एका गाळ्यातून घेतल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. मार्केटयार्डातील तरकारी विभागातील मे. बाळासाहेब गणपतराव वालगुडे यांच्या गाळा क्रमांक 528 येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी शुभम बसवराज म्हेत्रे (वय 21, रा. मार्केटयार्ड) हा युवक गुटखा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गाळ्यातील 66 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करून पंचनामा केला.

या प्रकरणी शुभम म्हेत्रे याच्यावर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंबंधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या साखळीतील इतर विक्रेते आणि पुरवठादारांचा शोध घेतला जात असून, मार्केटयार्ड परिसरात अशा प्रकारच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
भाजीपाल्याच्या गाळ्याच्या आडून चालणाऱ्या या बेकायदेशीर गुटखा विक्रीमुळे बाजार समिती प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमित तपासणी करून अशा प्रकारच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.







