कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. असं असताना भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र ई-मेलद्वारे पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहेत. यामुळे कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
समरजीत घाटगे हे तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल देसाई यांचा राधानगरी- बुदरगड विधासभा मतदारसंघ हा कार्यक्षेत्र आहे. याच विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली होती. याच मागणीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता झालेल्या उलथापलथीनंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरात भाजपला गळती लागल्याचे बोलले जात आहे.
राहुल देसाई हे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या देसाई यांनी उमेदवारी न मिळण्याचे संकेत मिळताच त्यांनी पक्षाला राम राम केला आहे.