माढा, (सोलापूर) : कर्नाटकात देवदर्शनासाठी गेलेले कुटुंब सुखरूप घरी परतले; मात्र घराचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात 61 वर्षीय अशोक भीमण्णा मुळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना 25 ऑगस्टच्या मध्यरात्री माढा तालुक्यातील जामगाव येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळे कुटुंबीय कर्नाटकातील विविध देवस्थानांच्या दर्शनासाठी गेले होते. घरात कुटुंबाचा मुख्य आधार असलेले अशोक मुळे हे एकटेच होते. 25 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी चोरीच्या किंवा दरोड्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. घरात एकटेच असलेल्या अशोक मुळे यांनी चोरट्यांना विरोध केला असावा, याच रागातून अज्ञात हल्लेखोरांनी अशोक मुळे यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी वार करून त्यांची अत्यंत अमानुष व निर्घृण हत्या केली आणि पोबारा केला.

देवदर्शन आटोपून आनंदाने अन् उत्साहाने घरी परतलेल्या कुटुंबीयांनी जसे घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला, तसे समोरचे विषण्ण दृश्य पाहून त्यांच्या तोंडातील शब्दच सुटले. संपूर्ण घर रक्ताने माखलेले होते आणि अशोक मुळे यांचा मृतदेह पडलेला होता. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा आणि टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. “आम्ही देवाला भेटायला गेलो अन् इकडे आमच्या घरातला देवच हरपला…” असा आक्रोश करत कुटुंबीयांनी केलेला शोक पाहून संपूर्ण जामगाव परिसरावर शोककळा पसरली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माढा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली असून, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घरफोडीच्या उद्देशाने ही हत्या झाली की त्यामागे काही जुना वाद किंवा अन्य कारण आहे, या दिशेने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.







