पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना हिंजवडी परिसरातील आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवासी सेवा नेमकी कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात, म्हणजेच ५ ते १५ सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

या प्रकल्पातील माण ते बालेवाडी हा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी तयार झाला आहे. या टप्प्यातील १२ स्थानकांवर मेट्रो चालवण्यास मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलै रोजी मंजुरी दिली होती. मात्र, अद्याप उद्घाटन न झाल्याने मेट्रो सेवा सुरू झालेली नाही.

या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची मूळ मुदत मार्च २०२५ होती. मात्र, विविध कारणांमुळे उद्घाटनाची तारीख सातत्याने पुढे ढकलली गेली. सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६, मे, जून आणि अखेर १५ ऑगस्ट २०२६ अशा अनेक संभाव्य तारखा समोर आल्या. मात्र, त्यापैकी कोणत्याही तारखेला प्रवासी सेवा सुरू होऊ शकली नाही. आता सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

माण आणि हिंजवडी येथे मेट्रोसाठी आधुनिक डेपो उभारण्यात आले आहेत. तसेच स्थानकांसाठी लागणाऱ्या विजेच्या एकूण गरजेपैकी सुमारे एक तृतीयांश वीज रूफटॉप सोलर प्रणालीच्या माध्यमातून निर्माण करण्याचे नियोजन आहे.
संपूर्ण प्रकल्पासाठीची मुदतही वाढवण्यात आली आहे. पूर्वी मार्च २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता ही मुदत मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मेट्रो सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले असून, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेट्रो प्रत्यक्षात सुरू झाल्यास हिंजवडी, माण आणि बालेवाडी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.






