पुणे: मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यातील पावसाबाबत चिंताजनक अंदाज समोर आला आहे. ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि आगामी सप्टेंबरमध्ये राज्यातील पावसाचे चित्र कसे राहील, याबाबत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, सप्टेंबरमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी केवळ पावसावर अवलंबून न राहता पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

खोळे यांच्या अंदाजानुसार, अल निनोचा प्रभाव वाढल्यास सप्टेंबरमध्ये उष्णता अधिक जाणवू शकते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या भागात हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र, या पावसामुळे पिकांना काही काळ दिलासा मिळेल; जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साठेल किंवा वाहून जाईल, असा जोरदार पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांत काही काळ मध्यम ते जोरदार सरी होण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस दीर्घकाळ टिकणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. जळगाव तसेच पुणे-सातारा घाटमाथ्यावर पावसाचा जोर तुलनेने चांगला राहू शकतो. कोकणात मात्र पाऊस अधिक टिकण्याची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस होऊ शकतो.

पावसाच्या दिवसांचा विचार केला तर कोकणात सुमारे १५ दिवस, मध्य महाराष्ट्रात १० ते १२ दिवस, मराठवाड्यात सुमारे ८ दिवस आणि विदर्भात जवळपास १० दिवस पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित काळात उन्हाची तीव्रता जाणवू शकते.
दरम्यान, सप्टेंबर हा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा काळ मानला जातो. या काळात वाऱ्यांच्या दिशेत बदल झाल्याने पावसाचे स्वरूपही बदलते. प्रशांत महासागरातील निनो ३.४ इंडेक्सच्या तापमानवाढीचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. मात्र, १० ते २० सप्टेंबरदरम्यान मॅडन-जुलियन ऑसिलेशन हिंद महासागर किंवा बंगालच्या उपसागराच्या अनुकूल टप्प्यात आल्यास महाराष्ट्रातील परतीच्या पावसाला काही प्रमाणात बळ मिळू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.







