कर्जत, ता. २५ : दुधोडी (ता. कर्जत) येथील एका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित विद्यार्थिनीने भरोसा सेलमध्ये दिलेल्या जबाबात मुख्याध्यापकांनी वारंवार अनुचित वर्तन केल्याचा, तसेच आक्षेपार्ह प्रस्ताव दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या घाबरली असून तिने शाळेत जाणेही बंद केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक रामराव भोसले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भया दुधोडी येथील स्थानिक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, कबड्डी सरावाच्या वेळी मुख्याध्यापकांशी तिची ओळख झाली. सुरुवातीला शाळेतील घडामोडींची माहिती विचारणे, विशेष लक्ष देणे आणि मॉनिटर म्हणून नियुक्ती करणे अशा प्रकारातून विश्वास संपादन करण्यात आला.
शाळेच्या रायगड-लोणावळा सहलीदरम्यान बसमध्ये तिची प्रकृती बिघडल्यावर मुख्याध्यापकांनी तिला स्वतःच्या शेजारी बसण्यास सांगितले आणि त्यानंतर अनुचित स्पर्श केला आहे. तसेच वाढदिवसानिमित्त कार्यालयात बोलावून भेटवस्तू देताना फोटो काढल्याचाही उल्लेख तिने जबाबात केला आहे. दहावीच्या पूर्वतयारी वर्गादरम्यान मुख्याध्यापकांनी तिला कार्यालयात बोलावून वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न विचारले. त्यानंतर आक्षेपार्ह प्रस्ताव दिल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. या घटनेनंतर ती घाबरून कार्यालयातून बाहेर पडल्याचे तिने सांगितले.
यानंतरही मुख्याध्यापकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. कमी गुण मिळाल्याबाबत टोमणे मारणे, वर्गात सर्वांसमोर अपमान करणे आणि मानसिक त्रास देणे सुरूच राहिल्याने आपण शाळेत जाणे बंद केल्याचे तिने जबाबात नमूद केले आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने आपल्या आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर संबंधित तक्रार भरोसा सेलकडे करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच मुख्याध्यापकाला शाळेतून निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे.






