बारामती: बारामती दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत पक्षाच्या खासदारांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. “खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही. आमचा एकही खासदार फुटणार नाही,” असे ठाम विधान करत त्यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पूर्णविराम दिला.

गुरुवारी (25 जून) सकाळी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानातून शरद पवार आणि युगेंद्र पवार हे एकाच वाहनातून बाहेर पडत असताना पत्रकारांनी त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी अत्यंत थोडक्यात पण स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितले, **”खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही. आमचा एकही खासदार फुटणार नाही.”**

राज्यात अलीकडेच घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर विविध पक्षांमध्ये फूट पडण्याच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुढचा क्रमांक कोणाचा, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही खासदारही वेगळ्या भूमिकेत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
मात्र, या सर्व चर्चांना उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या पक्षातील एकजुटीवर विश्वास व्यक्त केला. राज्यात जशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडल्या, तशा आमच्या पक्षात होणार नाहीत, असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिला.
दरम्यान, बारामती दौऱ्यादरम्यान विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये संस्थेची महत्त्वाची बैठक पार पडली. पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.







