पुणे : पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार आणि सातत्यपूर्ण पावसामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या चारही प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला असून, तो 91.47% वर पोहोचला आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे.

यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन थोडे उशिराने झाले होते. त्यामुळे सुरुवातीला धरणांतील खालावलेल्या साठ्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यामध्ये पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आणि धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक वेगाने सुरू झाली.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी या चार धरणांमध्ये 91.35% जलसाठा उपलब्ध होता. यंदाच्या पावसामुळे धरणांनी गेल्या वर्षीची सरासरीदेखील ओलांडली आहे.पुण्याला पाणी पुरवणाऱ्या चार मुख्य धरणांपैकी खडकवासला धरण 100% भरले असून ते पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहे.
उर्वरित धरणांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
खडकवासला 100%,पानशेत 96.94%,वरसगाव 89.90% ,टेमघर 77.98%
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत धरण क्षेत्रात पुन्हा पावसाची हजेरी राहू शकते. यामुळे साठ्यात आणखी वाढ होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. चारही धरणांमध्ये सध्या पुरेसा साठा जमा झाल्याने पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






