कोल्हापूर : ईडीच्या रडारवर असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयंत पाटील हे एका घटनेमुळे बचावले, नाहीतर त्यांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती, याबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला. मुश्रीफ यामी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुश्रीफ म्हणाले की, आमदार जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत आले नाहीत, अन्यथा त्यांनीही आमच्या सोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी कोणती, हे मी वेळ आल्यावर स्पष्ट करणार आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून खासदार शरद पवारांचे निष्ठांवत म्हणून ओळख राहिलेल्या हसन मुश्रीफ ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झाले आहेत. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, या टिकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मौन बाळगले.
मराठा आरक्षणावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, मराठा समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी माझी गाडी अडवली, पण मी त्यांना अतिशय समाधानकारक उत्तर दिलं आहे. न्यायालयात टिकणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न करत असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.