सांगली : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर एका जिमचालक तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. आरोपी व त्याला मदत करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी आडपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
संग्राम देशमुख असे आरोपीचे नाव आहे तर त्याला सुमित्रा लेंगरे या महिलेने मदत केल्याचा आरोप आहे.
पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हा अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी आज आटपाडी शहर बंद करत आटपाडी बसस्थानकापासून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवावी, सरकारी वकील या केसमध्ये द्यावा, अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. आटपाडीमधील अल्पवयीन मुलीवर गेल्या काही दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान, संग्राम देशमुखहा आटपाडी मध्ये जिम चालवत होता. आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे.