बार्शी, (सोलापूर) : गुळपोळी (ता.बार्शी) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची (जोगेश्वरी) यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पारंपरिक वारसा जपलेल्या जत्रेला गावातील नागरिकांचा यंदाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह पारंपरिक सोंगांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. स्थानिक नागरिकांनी साकारलेल्या महाभारत, रामायणातील श्रीराम-लक्ष्मण हनुमान, सीता, लव, अंकुश, रावण, शकुनी मामा, अर्जुन, अशी विविध पात्रं गावातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच साकारली होती. त्यामुळे झगमगती वेशभूषा पाहून लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनी उत्साहात आनंद लुटला.
शेकडो वर्षापासून हि सोंगाची परंपरा सुरु आहे. या सोंगांमुळे पारंपरिक लोकसंस्कृतीचे जतन होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. विविध प्रबोधनपर संदेश देणारी सोंगंही यंदा पाहायला मिळाली. जत्रेतील मिरवणुकी दरम्यान वाद्यांच्या गजरात सोंगांनी केलेल्या नृत्यप्रदर्शनाने वातावरण भारावून गेले. त्यामुळे रात्रभर ग्रामस्थ व आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन केले जाते. अशा विविध पारंपारीक वेशभूषा परिधान करून रात्रभर सोंगाचा कार्यक्रम पार पडला.
एप्रिल महिन्यात म्हणजे शुध्द चैत्र पोर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला श्री भैरवनाथ (जोगेश्वरी) यात्रेला प्रारंभ होतो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त दर्शनाला येतात. चैत्र शुध्द व्दादशीला देव गावा बाहेर नऊ दिवस घटस्थापना केली जाते. चैत्र पोर्णिमेला दिवशी मध्यरात्रीपासून श्री भैरवनाथ देवाला पुरण पोळीचा नैवद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रांरभ होतो.
हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रेला प्रारंभ झाला. या दिवशी पहाटेपासूनच भक्तीपूर्ण दंडवत, विविध धार्मिक पूजाविधीनी काळभैरवनाथाची महापूजा, दर्शनासाठी भाविकांची झालेली अलोट गर्दी, आकर्षक विद्युत रोषणाई, शोभेचे दारूकाम, व सोबतीला मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल या जत्रेत असते अशा उत्साही व भक्तीमय वातावरणात गुळपोळी (ता. बार्शी) येथील श्री काळभैरवनाथाची यात्रा संपन्न झाली.
दरम्यान, शनिवारी (ता. 12) पहाटे साडेपाच वाजता भजन व शेरण्या, श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी 9 ते सायंकाळी 5 आरत्या व शेरण्या तर रात्री 9 वाजता श्री भैरवनाथ महात्म्य कथेचे सादरीकरण मनोज भडकवाड सुर्डीकर यांनी केले. रविवारी (ता. 13) अंबील रथयात्रा कोरफळे ते गुळपोळी स्वागतोत्सुक करण्यात आले. तर संध्याकाळी पारंपरीक सोंगाचा कार्यक्रम, छबीना व शोभेची दारु उडवण्यात आली. सोमवारी (ता. 14) दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (ता. 15) लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा कमिटीतर्फे गावातील सर्व नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीतर्फे देण्यात आली आहे.
सोंगाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवतरुणांमध्ये असलेले कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळत असते. अनेक वर्षापासून सुरु असलेली पारंपारिक पद्धत पुढे तशीच सुरु आहे. पूर्वजांपासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा अखंडितपणे आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे.
-शिरीष चिकणे, माजी ग्रामपंचायत सदस्य, गुळपोळी (ता. बार्शी)