मोहोळ: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच आता मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिस-यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपचे राम सातपुते (Ram Satpute) यांना मतदान करा असे अप्रत्यक्षरित्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. यावेळी या सभेत शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी शिंदे (Tanaji Shinde) उपस्थित होते.
मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर काल रविवारी जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना रमेश कदम म्हणाले, आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी निवडूण आल्यानंतर जवळपास आठ महिने आमदार म्हणून काम केले. मागेल त्यांना पाणी, मागेल त्यांना रस्ते ही संकल्पना स्व: खर्चातून राबविली आहे.
मतदारसंघातील समस्या सोडवताना जात, धर्म, पक्ष पाळला नाही. राजकारण केलं नाही. सर्वच पक्षातील लोकांच्या समस्या सोडवल्या. राजकारणामध्ये केवळ भावनिक होऊन चालत नाही. राजकारण करत असताना वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्यामुळे आपण सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबत उभे राहायचं असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.