कोल्हापूर : राज्यामध्ये सद्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभेच्या मोर्चेबांधणी बळकट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. शहांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. अमित शहांना आपण दररोज नमस्कार केला पाहिजे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“परमेश्वरावर, महापुरुषांवर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊतच करू शकतात. खर म्हणजे 370 कलम रद्द केलं म्हणून अमित शहा यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. अस काम असणाऱ्यांवर टीका हे संजय राऊतच करू शकतात,” अशी टीका भारतीय जनता पक्षाच नेते, तसेच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
..तर मी त्यांना महिलांची माफी मागायला सांगेन
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजितदादा समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुनही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र भुयार हे माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले आहेत माहित नाही, मात्र त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन,” असं ते म्हणाले.
….न ठेवण्यासारखी महाराष्ट्राची जनता नाही
“2024 ला तीनही पक्षांच्या मिळून 270 च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अन्य चांगल्या योजना या सरकारने लोकांना दिल्या आहेत. या योजना देऊनही लोक उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखी महाराष्ट्राची जनता नाही. उपकाराची भावना काहींनी ठेवली असती तर 2019 लाच युतीचे सरकार आले असते. आता त्यांचे जे नुकसान झालं आहे ते झालं नसतं,” असा टोलाही यावेळी मंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.