इस्लापूर : तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करुन बदनामी करीत व तिला धमकी दिल्याप्रकरणी पिता पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातील मौजे इरेगाव येथील रहिवासी अक्षय दशरथ आंबेकर (२०) व दशरथ आंबेकर हे पिता पुत्र आहेत. अक्षयने पीडितेची संगणक कोर्समध्ये ओळख करुन घेतली आणि नंतर दोन वेळा तिला आपल्या राहत्या घरी नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व तिचे विवस्त्र फोटो काढून घेतले.
त्यानंतर अक्षयने माझ्यासोबत तिला पुन्हा फोटो दाखवून तू माझ्यासोबत चल म्हटले. तिने नकार दिल्यावर त्याने तिचे विवस्त्र फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. हा सारा प्रकार एप्रिल २०२२ पासून सुरू होता. याबाबत पीडितेने इस्लापूर पोलिस ठाणे गाठून कैफियत मांडली. त्यानंतर अक्षयचा पिता दशरथने तिला पोलिस ठाण्यातील अर्ज मागे घे, अन्यथा तुझ्या घरी जाऊन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करू अशी धमकी दिली. या गंभीर घटनेबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन इस्लापूर पोलिस ठाण्यात आरोपी अक्षय व दशरथ आंबेकर या पिता पुत्रांविरुद्ध गुरनं १०८/२४ कलम ३७६ (२), ३५४ (क), ५०६,३४ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अतुल डाके करीत आहेत.