सोलापूर : पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याचे पाकीट काढून त्यातील रोख ७ हजार रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड काढून घेतले. सदर बझार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
फिर्यादी क्षीतिज सावळे (रा. मजरेवाडी) यास एका अनोळखी मोबाईल धारकाने फोन करून तू लक्ष्मण मेरगुचा मालक बोलतो का? तो आमचे पैसे देणार आहे. त्याचे पैसे लवकरात लवकर देऊन टाक, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी क्षीतिज साळवे यांनी फोन करून तुला माझा नंबर कोणी दिला, अशी विचारणा केली असता त्याने पठाणने नंबर दिला, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादीने पठाण यास फोन केला असता पठाण याने तुम्हाला फोन केलेल्या व्यक्तीला पैसे देऊन टाका. मेरगुचे पगारीचे पैसे द्यावे लागतील. बाकी काही कारण सांगू नका. नाहीतर तुम्हाला धक्क्याला लावेन, असे म्हणून दमदाटी केली व शिवीगाळ केली.
त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मुस्लिम कब्रस्तान वॉशिंग सेंटर येथे फिर्यादी हा आरोपी पठाण ऊर्फ लक्ष्मण माने यास भेटावयास गेला असता त्या ठिकाणी लक्ष्मण माने व त्याच्यसोबत असलेल्या सात ते आठ जणांनी मारहाण केली. तसेच खिशातील पाकीट चोरून नेले. सदर बझार पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कामूर्ती हे करत आहेत.