पाचगणी : भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या पुस्तकांच्या गावात एका लॉज व्यवसायिकास तलवारीचा धाक दाखवून, गुडघ्यापासून खालचा पाय काढून टाकीन, अशी धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी परिसरात खळबळ उडाली आहे. तलवार नाचवणाऱ्या व धमकी देणाऱ्या साताऱ्याच्या चौघांवर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संजय गणपत मोजर (वय ४५, मोझर पॅलेस हायलँड पार्क, दानवली रोड, भिलार, ता. महाबळेश्वर, मूळ रा. नाळेवाडी, जि. सातारा) यांचे हॉटेल आहे. या हॉटेलचा कामगार राजेश केळगणे यांच्या फोनवर १८ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपींनी फोन केला. मी संध्याकाळी ७ वाजता तुमच्या बंगल्यावर येणार असून, ‘तुझा बंगला तुला फोडून दाखवतो’ असे म्हणून धमकी दिली.
दरम्यान, १९ जानेवारी रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास अनुप गाडे (रा. सातारा, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) हा आपल्या साथीदारांसह भिलार येथील बंगल्यावर आला. त्याने व साथीदारांनी त्यांच्या हातातील तलवार दाखवून ‘तुला या प्रॉपर्टीमध्ये राहायचे असेल तर मला १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. नाही दिलीस तर तुझा गुडघ्यापासून खालचा पाय काढून टाकीन’, अशी धमकी देऊन बंगल्याबाहेरचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात संजय गणपत मोजर यांनी फिर्याद दिली असून, यावरून पांचगणी पोलिसांनी अनुप गाडे, सागर मेश्राम आणि आणखी २ अनोळखी व्यक्ती अशा चार जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. भालचिम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी भेट दिली. अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.