China Landslide : चीनमधील युनान येथील डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून २०० जणांची सुटका करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. या घटनेत अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली आहे. युनानमधील लियांगसुई गावात आज २२ जानेवारीला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले आहे. अपघाताचा परिसर झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहराचा आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. भूस्खलनात १८ घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.
या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी ३३ अग्निशमन वाहने आणि १० लोडिंग मशीनसह २०० हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनास्थळी अद्यापही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.