अहिल्यानगर: शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध शनिदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिअमावास्यानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा होणाऱ्या संभाव्य प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शनिअमावास्येच्या दिवशी, म्हणजेच येत्या शनिवार, 23 ऑगस्ट, शनिदेवाच्या चौथऱ्यावर भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. 22 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या महाआरतीपासून ते 23 ऑगस्टपर्यंत चौथऱ्यावर दर्शन व तेलाभिषेकास मनाई करण्यात आली आहे.
ही प्रवेशबंदी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आली आहे. सामान्यतः भाविक शनिचौथऱ्यावर जाऊन स्वतः शनिदेवाला तेलाभिषेक करतात, मात्र यंदा मंदिर परिसरात वाढलेल्या गर्दीच्या शक्यतेमुळे ही परंपरा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
देवस्थान समितीने भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि दर्शनाची व्यवस्था शांततेत पार पडावी, असे आवाहन केले आहे.







