सोलापूर: सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांदरम्यान सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया आणि मेसेजिंग खाते तयार करून नागरिकांकडून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि सायबर विभाग सतर्क झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनाम आणि थायलंडमधून काही अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांचे नाव, पदनाम आणि छायाचित्र वापरून बनावट खाते तयार केले. या खात्याद्वारे काही नागरिकांशी संपर्क साधून आर्थिक मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्वतः सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस विभागाच्या सायबर सेलमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कोणत्याही नागरिकांकडे अशा प्रकारे पैशांची मागणी किंवा आर्थिक व्यवहार केले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद मेसेज, कॉल किंवा खात्याची माहिती तातडीने प्रशासन किंवा सायबर पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, बनावट खात्यावर “Collector & District Magistrate” असे पदनाम वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याचा धोका अधिक वाढला होता.
दरम्यान, या घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सायबर फसवणुकीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.







