लातूर: नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला असून सीबीआयची चौकशी लातूरमध्ये आणखी व्यापक होताना दिसत आहे. मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असतानाच आता या प्रकरणात आणखी एका डॉक्टराचे नाव तपासाच्या कक्षेत आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील प्रसिद्ध प्रसूती रोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआयच्या पथकाने संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी लातूरमधील अस्थायी कार्यालयात आणल्याचे समजते. या प्रकरणात हा पाचवा डॉक्टर असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी या तपासादरम्यान काही बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता तपासाचा फोकस आणखी वाढवत सीबीआयने नवीन धागेदोरे शोधण्याचे काम सुरू ठेवले आहे.
सीबीआयच्या पथकाने दिवसभर लातूर शहरातील विविध भागांत माहिती संकलन केल्याची माहिती आहे. काही हॉस्टेलवर जाऊन विद्यार्थ्यांची चौकशी केल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर पथक औसा रोड परिसरातील संबंधित डॉक्टरांच्या दवाखान्यात दाखल झाले. काही कागदपत्रांची पडताळणी आणि प्राथमिक चौकशीनंतर डॉक्टरांना पुढील चौकशीसाठी सोबत नेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, सीबीआयचे पथक पुन्हा एकदा शिवराज मोटेगावकर यांच्या खाजगी क्लासेसमध्ये दाखल झाले आहे. आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि संभाव्य कनेक्शनची तपासणी सुरू असल्याचे समोर येत आहे.
तसेच, मोटेगावकर यांच्या नातेवाईकांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग होता का, तसेच पैशांची साखळी आणि गुंतवणुकीचा मागोवा काय आहे, याचाही तपास सीबीआयकडून केला जात असल्याची चर्चा आहे. या नव्या चौकशीमुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आणखी गंभीर आणि व्यापक स्वरूपात पुढे जात असल्याचे दिसत आहे.







