उरुळी कांचन : वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील बोल्हाई माता मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. रविवारी (ता. 25) दुपारी गर्दीचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथील रोहित ताजणे हे कुटुंबीयांसह बोल्हाई माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी रांगेत उभे असताना, त्यांच्या आजी यशोदाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची आणि काळ्या मण्यांची पोत अज्ञात चोरट्याने चोरली. मंदिराबाहेर आल्यानंतर पोत चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही पोत मिळून आली नाही.
रांजणगाव येथील एका भाविकाचीही अशाच पद्धतीने पोत चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील रविवारीही 78 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची गळसरी चोरीला गेली होती. त्यामुळे मंदिर परिसरात दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

बोल्हाई माता मंदिरात दर रविवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरत असल्याच्या घटनांमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांचा नियमित बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.






