ओतूर, ता. 28 : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि नारायणगाव परिसरात रात्रीच्या वेळी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत चार घरफोड्यांची उकल करण्यात आली असून, 19 तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो 770 ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 38 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

वसीम मुनीर पठाण (वय-29, रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड), अदनान युनूस पठाण (वय 26, सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक; मूळ रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव) आणि सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय 40, रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव) तसेच चोरीची चांदी खरेदी करणाऱ्या सागर अशोक शिंदे (वय 30, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूर पोलिस ठाण्यात 5 ऑक्टोबर 2026 रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. ओतूर आणि नारायणगाव परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्याने पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू करून घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयित कार दिसून आली. या कारचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ओतूरपासून नाशिकपर्यंत सुमारे 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकमधील इंदिरानगर आणि वडाळा परिसरात तपास करण्यात आला.

त्यातून संबंधित कार सोनू उर्फ शरीफ रसूल शेख वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे साथीदार वसीम पठाण आणि अदनान पठाण यांचाही या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली.
घरफोड्या करताना पकडले जाऊ नये यासाठी आरोपींनी वायरलेस वॉकी-टॉकीचा वापर केल्याचेही तपासात समोर आले असून, ही उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत ओतूर पोलिस ठाण्यातील तीन आणि नारायणगाव पोलिस ठाण्यातील एक अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, पुढील तपास ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.






