पुणे: सिंहगड रस्ता परिसरात दहशत निर्माण केल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी 21 वर्षीय तरुणावर मोठी कारवाई केली आहे. प्रथमेश ऊर्फ जयेश पंकज देसाई (रा. नऱ्हे) याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रथमेश देसाई याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि नागरिकांना धमकावणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या वागणुकीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पथकाने देसाई याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती गोळा करून तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाची वरिष्ठ स्तरावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी त्याला 2 वर्षांसाठी हद्दीतून बाहेर ठेवण्याचे आदेश जारी केले.

या कारवाईनुसार, प्रथमेश देसाई याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीत राहता येणार नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरून न जाता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.








