कोल्हापूर: कोल्हापूरात (Crime News) एका तरुणाने त्याच्या जीवलग मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वायरने मित्राचा गळा आवळून खून केला आणि आरोपीने मृतदेह रात्रभर एका विजेच्या खांबाला वायरने बांधून ठेवला. सिद्धू शंकर बनवी (20), (मूळ रा. गोकाक, जि. बेळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी जलद तपास करून फक्त 6 तासांच्या आत या खुनाचे रहस्य उलगडले आरोपी मनीष जालिंदर राऊत (28) याला अटक केली आहे.
हॉकी स्टेडियमजवळ एका लाईटच्या खांबाला वायरने बांधलेला सिद्धूचा मृतदेह नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सिद्धू आणि मनीष एकाच ठिकाणी काम करत होते आणि जीवलग मित्र होते. घटनेच्या दिवशी दोघेही दारू पिण्यासाठी बसले. जेवण झाल्यानंतर हॉटेलमध्ये त्यांच्यात जोरदार वाद झाला. याच वेळी सिद्धूने मनीषला आईवरून शिवीगाळ करून त्याचा अपमान केला. दोघेही सोबत घरी येत असतांना वाद वाढला, रागाच्या भरात, मनीषने गळा वायरने आवळला आणि मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह त्याच खांबाला बांधून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक तातडीने खबऱ्यांच्या नेटवर्कचा प्रभावी वापर करून 6 तासांच्या आतच आरोपी मनीष जालिंदर राऊतला अटक केली.






