सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या जाचाला कंटाळून, अवघ्या २ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव संजय राजाराम राऊत असे असून तो यावली गावचा रहिवासी होता. दोन महिन्यांपूर्वीच संजयचा विवाह झाला होता, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याला पत्नीचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी मिळून संजयला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या सततच्या छळामुळे १० जुलै रोजी संजयने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत संजयचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडिलांच्या या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांनी संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे या दोघांविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त’ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







