पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.याचे काही जुने फोटो उघड झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला होता. या संपूर्ण प्रक्रियेत पडद्यामागील मुख्य सूत्रधार खासदार श्रीकांत शिंदे हेच होते, या दाव्याला आता समोर आलेल्या फोटोंमुळे बळकटी मिळाली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतच्या या फोटोंमध्ये ठाकरे गटातून बाहेर पडलेले खासदार स्पष्टपणे दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घडामोड 18 जून रोजी अत्यंत गुप्तपणे पार पडली होती. सुरुवातीला संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 5 खासदारांना सोबत घेऊन श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक हे थेट दिल्लीत ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते.

परंतु, कायदेशीर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला 6 खासदारांचा कोरम पूर्ण करणे गरजेचे होते. यासाठी श्रीकांत शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली. ते विशेष चार्टर्ड विमानाने दिल्लीहून थेट नांदेडला पोहोचले. तेथून त्यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोबत घेतले आणि पुन्हा दिल्ली गाठली. ओमराजे निंबाळकर यांच्या एन्ट्रीमुळे 6 जणांचा आकडा पूर्ण झाला आणि या सर्व खासदारांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला.
या राजकीय नाट्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठा धक्का बसला, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद संसदेत लक्षणीय वाढली. आता या संपूर्ण ‘ऑपरेशन टायगर’चे नेतृत्व आणि नियोजन श्रीकांत शिंदे यांनीच केले होते, हे या नव्या फोटोंमुळे आणि समोर आलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे







