पुणे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला गालबोट लावणारा प्रकार उघडकीस आला आहे.एका 25 वर्षीय चुलत भावाने आपल्याच 13 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण पीडित मुलीवर सातत्याने अत्याचार करत होता. हे भयंकर कृत्य कोणाला सांगू नये यासाठी तो मुलीला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे. त्याच्या या धमकीमुळे भयभीत झालेली चिमुकली ही सर्व पीडा मूकपणे सहन करत होती. मुलगी घाबरल्याचा गैरफायदा घेत नराधम भाऊ तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहिला.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार आपल्या आईकडे केली. आईने तात्काळ तिला वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. मात्र, तपासणीनंतर मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. या अनपेक्षित माहितीमुळे धक्का बसलेल्या आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली, तेव्हा चुलत भावाचे हे काळं कृत्य उघड झाले.
आपल्याच घरात अन् नातेवाईकाकडून असा प्रकार घडल्याने कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडितेच्या पालकांनी तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित नराधम भावाविरोधात पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.






