पुणे : जेजुरीमध्ये मदतीचा बहाणा करत दोन भामट्यांनी एका महिलेचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना घडली आहे. “परिसरात सोने चोरी करणारे फिरत आहेत, त्यामुळे दागिने काढून सुरक्षित ठेवा,” असे सांगून आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिची फसवणूक केली.

याप्रकरणी कुसुम प्रकाश भुजबळ (रा. दौंडज, सध्या रा. विद्यानगर, जेजुरी) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जेजुरी-सासवड महामार्गावरील हॉटेल शिवानंद शेजारील टपरीवर कुसुम भुजबळ बसल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले. परिसरात दागिने चोरणारी टोळी फिरत असल्याचे सांगून त्यांनी अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवण्याचा सल्ला दिला.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भुजबळ यांनी कानातील चार ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आणि गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढली. त्यावेळी आरोपींनी “आम्ही दागिने व्यवस्थित रुमालात गुंडाळून देतो,” असे सांगत हातचलाखीने दागिने लंपास केले आणि तेथून पसार झाले.
काही वेळाने रुमाल उघडून पाहिल्यानंतर दागिने गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. जेजुरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






