पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी बचाव पथकांना मोठी कसरत करावी लागली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता, महापालिकेचा प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि भ्रष्टाचाराचे धक्कादायक कंगोरे समोर आले आहेत.

या दुर्घटनेचे मूळ कारण आता स्पष्ट झाले आहे. २७ जुलै २०२३ रोजी महापालिकेच्या बांधकाम विभागाने या इमारतीच्या केवळ तळमजल्यासाठीच वापराची परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तिथे ३ मजली इमारत उभी करण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असूनही तिथे महापालिकेचे कामकाज, कँटीन आणि कॉन्फरन्स रूम सुरू होत्या. पर्यावरण विभागाने प्रस्ताव दिल्यानंतर, अवघ्या २४ तासांत कोणत्याही प्रकारची जागेवर पाहणी न करता बांधकाम विभागाने परवाना कसा मंजूर केला, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवैध मजल्यांचे हे बांधकाम नक्की कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले आणि तिथे कामगारांना धोकादायक परिस्थितीत काम करायला कोणी भाग पाडले, याचा तपास आता सुरू झाला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना मृतांच्या नातेवाईकांनी घेराव घातला.पीडित कुटुंबाला त्वरित भरपाई मिळावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांकडून आक्रमकपणे केली जात आहे.







