पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे निलख येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर आणि त्याच्या भावांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अमोल वीर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पिंपळे निलख परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अमोल वीर याने काही काळापूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहाला संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच कारणातून तरुणीचा भाऊ आणि त्याच्यासोबत आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी अमोल आणि त्याच्या भावांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपळे निलख परिसरात अमोलला गाठल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत रक्ताने माखलेली धारदार शस्त्रे आणि एक पिस्तूल जप्त केले आहे. या पिस्तुलाचा वापर करून आरोपींनी गोळीबार केला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अमोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. प्रेमविवाहाच्या कारणातून झालेल्या या हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम आणि आरोपींच्या भूमिकेचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.







