पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी फरासखाना, विश्रामबाग आणि खडक या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केवळ तीनच पोलीस ठाण्यांच्या परिसरात ‘ड्राय डे’ लागू केल्यामुळे या निर्णयाच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या तीन भागांतील मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार असली तरी शेजारील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यविक्री सुरू राहणार आहे. त्यामुळे मद्य खरेदीसाठी नागरिक लगतच्या भागात जाण्याची शक्यता आहे. परिणामी त्या भागातील दुकानांवर गर्दी वाढून वादावादी, शिवीगाळ आणि मारामारीसारख्या घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सवात पुणे शहरात मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक दाखल होतात. विविध मंडळांच्या मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि गर्दीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा लागतो. अशा वेळी काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यविक्री बंद आणि इतर ठिकाणी सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे पोलिसांवरील अतिरिक्त जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यविक्री बंद राहिल्याने परवानाधारक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांनाही त्याचा फटका बसू शकतो. मद्यविक्रीतून मिळणाऱ्या शासनाच्या महसुलावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गणेशोत्सव काळात ‘ड्राय डे’ लागू करण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट आणि समान धोरण आखावे, अशी मागणी होत आहे. केवळ निवडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत निर्बंध लावण्याऐवजी संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकसमान नियम लागू करण्याचा विचार करावा, अशी भूमिका पुढे आली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात सलग 12 दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.






