मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका तरुणाकडे बनावट पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पारेख या 24 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतःची ओळख पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी म्हणून करून देत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे असलेले PMO अधिकाऱ्याचे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

याचदरम्यान रोहन पारेखसोबत एक खासगी बॉडीगार्ड असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असताना बनावट ओळखपत्र असलेला तरुण आणि बंदुकधारी व्यक्ती आतपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रोहन पारेख कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमका कोणत्या उद्देशाने आला होता, त्याच्याकडे बनावट ओळखपत्र कसे आले आणि त्याच्या बॉडीगार्डकडे असलेल्या बंदुकीचा परवाना वैध आहे का, यासह विविध बाबींचा तपास केला जात आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे सुरक्षा यंत्रणांचे विशेष लक्ष आहे. संशयितांच्या चौकशीतून या प्रकारामागील नेमका उद्देश आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






