पंढरपूर: राज्यातील खोके सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काही पडले नसून जनता आता निराश झाली आहे. त्यामुळेच जनतेतून पाठिंबा नसल्याने हे सरकार निवडणुकांना सामोरं जायला घाबरत आहे. महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आता बहुदा लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर होतील असा टोला काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.
२०२४ मध्ये काही झाले तरी सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल आणि पंढरपूरचा आमदारही महाविकास आघाडीचा असेल, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे या पंढरपूर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आल्या असता त्या बोलत होत्या. आपल्याला पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती आपण पार पाडू अशा शब्दात त्यांनी सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत दिले.
दरम्यान राज्यातील कंत्राटी भरतीवरून राज्य सरकारवर टीका करताना आमदार शिंदे म्हणाल्या की, सध्याचे सरकार हे सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. हे सरकार त्यांच्या मर्जीतील सहा ठेकेदारांना संपूर्ण महाराष्ट्र विकत आहे. त्याच्या विरोधात काँग्रेस आवाज उठवणार आहे.