अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता आज रविवारी ( ता. 23) किरण काळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
आम्ही संघर्ष करण्याचा मार्ग निवडला: किरण काळे
किरण काळे यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला असता ते म्हणाले, अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. आम्ही अहिल्यानगर येथून आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून गर्जना केली त्याच मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. अनेक लोक सत्तेसाठी पक्षातून बाहेर पडत आहेत. आम्ही मात्र कोणत्याही निवडणूका समोर नसताना संघर्ष करण्याचा मार्ग निवडला आहे. आज या पडत्या काळात शिवसेनेमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत संघर्ष करणार आहोत.
या वेळी किरण काळे म्हणाले, हा पक्ष प्रवेश करण्यामागे निश्चितच काही कारणे आहेत. स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे, तेही महत्त्वाचं आहे. सध्या काही लोकं हिंदुत्वाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने पुढे नेत आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या प्रतिमा शिवजयंतीच्या रॅलीत झळकत आहेत. हे आम्ही सहन करणार नाहीत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये हिंदुत्वाची मशाल ज्योत फिरवु असे किरण काळे यांनी म्हटले आहे.