कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातून एक अत्यंत अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचे केवळ पैशांच्या हव्यासापोटी अपहरण करून त्याची अमानुष हत्या करण्यात आली. भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे या व्यावसायिकाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, खंडणीसाठी पैसे घेऊन बोलावले असतानाही त्यांनी भरतेश यांचा जीव घेतला.

समोर आलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमांनी भरतेश यांचे अपहरण करून भावाला 25 लाखांच्या खंडणीसाठी फोन केला. गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे भरतेश यांचा भाऊ महावीर पैसे घेऊन रातोरात ठराविक ठिकाणी पोहोचले. मात्र, आरोपी वारंवार आपले लोकेशन बदलत राहिले. पैसे देण्याची तयारी असूनही, काही तासांनंतर भरतेश यांचा मृतदेह शेरी मळा परिसरातील एका निर्जन शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
गुन्हेगारांच्या कॉलचे रेकॉर्डिंग देऊनही सुरुवातीला पोलिसांनी केवळ ‘बेपत्ता’ असल्याची नोंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर वेळेत नाकाबंदी आणि वेगाने तपास झाला असता, तर कदाचित भरतेश यांचा जीव वाचला असता. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.






