Pune Cyber Crime: पुणे : सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे, याचे एक धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. मुंढवा परिसरातील 58 वर्षीय नागरिकाला फेसबुकवरील एका लिंकवर क्लिक केल्यामुळे तब्बल 1 कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या घटनेमुळे सायबर गुन्ह्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकाला फेसबुकवर एक लिंक दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला चांगला नफा मिळेल असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.
विश्वास बसल्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत संबंधित व्यक्तीने टप्प्याटप्प्याने एकूण 1 कोटी 22 लाख 49 हजार रुपये जमा केले. मात्र, नंतर परतावा मागितल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अनोळखी लिंक, गुंतवणुकीचे आमिष किंवा जादा परताव्याचे आश्वासन देणाऱ्या संदेशांपासून दूर राहावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे पाठवू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.




