Nashik Crime : नाशिक : शहरातील सिडको परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एका राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिडकोमधील दत्त चौक परिसरात घडली. सुयश पाटील हे त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले असताना अचानक काही जण मागून आले आणि त्यांनी हल्ला केला. आरोपींनी कोयत्याने वार करताच परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाटील काही क्षण गोंधळले, मात्र त्यांनी स्वतःचा बचाव करत तिथून पळण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही त्यांनी मोठ्या धाडसाने हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये काही हल्लेखोर पाटील यांच्यावर वार करताना दिसत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. मात्र या प्रकरणात इतर कोणते कारण आहे का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.







