Pune Crime : पुणे : शहरातील झेड ब्रिज परिसरात घडलेल्या एका घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या भाऊ-बहिणीला काही तरुणांनी धमकावून लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी तरुण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून तो आपल्या नातेवाईक मुलीसोबत झेड ब्रिज परिसरात फिरायला गेला होता. ते दोघे नदीपात्राच्या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून काही तरुण तेथे आले.
आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत त्यांना अडवले आणि पैशांची मागणी केली. तरुणाला धमकावत त्याच्या मोबाईलमधून ऑनलाइन व्यवहार करून 1 हजार रुपये एका खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तसेच दोघांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेनंतर तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटवण्यात यश आले. नंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झेड ब्रिजसारख्या गर्दीच्या ठिकाणीही अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.







