नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 100 कोटींची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाने आता एका अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जयेश पुजारी याच्या प्रेयसीने न्यायालयात दिलेली कबुली केवळ धक्कादायक आहे. बेंगळुरूची ही व्यावसायिक महिला एका सराईत गुन्हेगाराच्या जाळ्यात कशी अडकली आणि तिने या गुन्ह्यात कशी साथ दिली, याचा उलगडा आता झाला आहे.

जयेश पुजारीने गडकरींच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून “100 कोटी द्या, नाहीतर बॉम्बने उडवून देऊ,” ही त्याची धमकी पोकळ नव्हती, तर त्यामागे पद्धतशीर नियोजन होते. धक्कादायक म्हणजे, तुरुंगात बसून तो बाहेरच्यांशी संपर्कात होता आणि हे सर्व करण्यासाठी त्याला त्याची प्रेयसी मंजुळा मदत करत होती.
मंजुळाने न्यायालयात कबूल केले की, तिनेच गडकरींच्या कार्यालयाचा नंबर शोधून जयेशला दिला होता. इतकेच नव्हे तर मंजुळाने जयेशला कराची विमानतळाचा नंबरही पुरवला होता. एका केंद्रीय मंत्र्याला धमकी देताना पाकिस्तानमधील ठिकाणांचे नंबर देणे, हे या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारे आहे.

मंजुळाच्या दाव्यानुसार, जयेशने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. मात्र, नंतर जयेश तिला ब्लॅकमेल करू लागला आणि त्याच्या सांगण्यावरून तिने स्वतःचे बँक खातेही खंडणीच्या रक्कमेसाठी वापरण्यास संमती दिली. याप्रकरणी अधिक तपास सध्या पोलिस करत आहेत.








