पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. या निवडणुकीत शिक्षकांची तब्बल 1,675 मतं बाद (अवैध) ठरली आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारांकडून मतदान प्रक्रियेत अशी चूक घडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या निवडणुकीत एकूण 53,186 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मतमोजणीच्या वेळी वैध आणि अवैध मतांची वर्गवारी करण्यात आली.त्यानुसार एकूण मतदान 53,186 इतके होते. मत मोजणीवेळी 51,511 वैध मतं तर बाद (अवैध) मतं: 1,675 समोर आली. या निवडणुकीच्या विजयासाठी आवश्यक कोटा 25,756 मतं इतका होता.
एकूण वैध मतांच्या आधारे विजयाचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीची 25,756 मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित होईल. जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या फेरीत हा कोटा पूर्ण करता आला नाही, तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल.

या मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले होते.

कौस्तुभ गावडे – भाजपचे अधिकृत उमेदवार.
सचिन सानप – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेला पुरस्कृत पाठिंबा.
जयंत आसगावकर – महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार.
दत्तात्रय सावंत – अपक्ष उमेदवार (रासपचा पाठिंबा).
शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजींचीच मतं बाद झाल्यामुळे, ही चूक अनावधानाने झाली की जाणीवपूर्वक केली गेली, याविषयी आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.






