कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) अपर्णा सुखदेव जाधव यांच्याविरोधात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस दलातील एका महिला अधिकाऱ्याने आपल्या पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अपर्णा जाधव यांच्याकडे होता.

तपासादरम्यान संशयिताला मदत करण्यासाठी आणि त्याच्या जामिनाच्या प्रक्रियेत सहकार्य करण्याच्या मोबदल्यात अपर्णा जाधव यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. एवढेच नव्हे, तर यापूर्वीही तक्रारदाराच्या वडिलांकडून २५ हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला असून त्यासंदर्भातील काही पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करण्यात आले.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ जुलै रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सापळा रचला होता. मात्र, कारवाईची माहिती मिळाल्याचा संशय आल्याने अपर्णा जाधव यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचे सांगण्यात आले.
तरीही चौकशीत लाचेची मागणी केल्याचे आणि यापूर्वी रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर्णा जाधव यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.







