पाचगणी : पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावरील भोसे खिंड येथे एका अनोळखी व्यक्तीची मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, भोसे खिंड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) गावच्या हद्दीत मंगळवारी (ता. २१) सकाळी राजमाता जिजाऊ हेल्थकेअर न्यूट्रिशियन सेंटर येथील बंद गाळ्याच्या कठड्यावर बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळला. या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने अंगात काळ्या रंगाचे जर्किन परिधान केले आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाचा चौकडी शर्ट, काळी पॅंट, चॉकलेटी रंगाची ट्रॅक पँट घातलेली असून, त्याच्या मानेच्या उजव्या बाजूस तीन चांदण्या गोंदलेल्या आहेत. उजव्या हाताच्या मनगटात पिवळे धातूचे कडे घातले आहे.
याबाबत अमित लक्ष्मण गोळे (वय ३२, रा. भोसे खिंड) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बेवारस मृतदेहाची ओळख पटल्यास त्यांनी तातडीने पाचगणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाचगणी पोलिसांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे व त्यांचे सहकारी करीत आहेत.