Maharashtra Politics : ज्याच्या राजकारणात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सलग सहा वेळा निवडून आलेले माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे घोषित केले आहे.
आ. बबन शिदेंची निवडणुकीतून माघार!
सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असून बबन शिंदे यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना आमदार शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
सलग सहा वेळा आमदार..
माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. आता मात्र या मतदार संघातून त्यांचे पुत्र रणजीत शिंदे विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी राजकीय सन्यास घेण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच उघडपणे आपल्या पुत्रासाठी मत मागायला सुरुवात केलेली दिसून येत आहे.
अभिजीत पाटील यांचे आव्हान!
पहिल्यांदाच विधानसभा लढवणाऱ्या रणजीत शिंदे यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक सोपी असणार नाही. रणजीत शिंदे यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पाटील विरुद्ध शिंदे अशी सरळ लढत पहायाला मिळणार आहे.