पुणे : महाविकास आघाडीला कमकुवत करण्यासाठी भाजपने जोरदार रणनिती आखली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटातील पवार यांचा जवळचा आणि विश्वासू नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. या नेत्याला पक्षात आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ताकदीचे नेते भाजपमध्ये आणल्यास लोकसभेला ४२ पेक्षा जास्त जागा जिंकणे शक्य आहे. यामुळे भाजपने तोडफोडीचे राजकारण करण्याची रणनीती आखली आहे. अशोक चव्हाणांना फोडल्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघांना याचा फायदा होईल. मराठवाड्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला आहे. याच भागातील शरद पवारांचा विश्वासू नेता त्यांच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. लवकरच या नेत्याचा पक्षप्रवेश होईल, अशीही चर्चा रंगत आहे.
दरम्यान, या नेत्याकडे प्रशासकीय अनुभव मोठा आहे. त्याने मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तो नेता शरद पवार यांच्यासोबत उभा राहिला. या नेत्याला पक्षात आणले तर सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये आपली ताकद वाढेल, असे भाजपचे समीकरण आहे. या नेत्याची दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा झाल्याचेही समोर येत आहे.
या नेत्याच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. किंवा त्याच नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं का? यावर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांचे विश्वासू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व होते. आता त्याच शरद पवारांच्या विश्वासू नेत्याला पक्षात घेऊन भाजप आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.
याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवा असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंघ असून, येत्या दोन-तीन दिवसांत जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका पाटील यांनी सत्ताधारी गटावर केली आहे.