Baramati Politics : राज्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत एकत्र असली तरी बारामतीच्या राजकारणात वेगळीच समीकरणे तयार होत आहेत. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपने नवा डाव खेळत मुरलीधर मोहोळ आणि राहुल कुल या जोडीला पुढे करून स्थानिक राजकारणात हालचाली वाढवल्या आहेत. या जोडीमुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र आहे.

भाजपने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करत बारामतीत सत्तेचे समीकरण बदलण्याची तयारी सुरू केली आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी भाजपने आपले बळ वाढवण्यासाठी आणि अजित पवारांच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना बारामतीत प्रभारी म्हणून नेमलं आहे. नुकत्याच महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत अजित पवारांशी थेट सामना करणारे मोहोळ आता त्यांच्या गडात भाजपचा मोर्चा सांभाळणार आहेत.

दरम्यान, दौंड तालुक्याचे आमदार आणि माजी अजित पवार समर्थक राहूल कुल यांना बारामतीच्या प्रमुखपदी जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल कुल यांच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादीतील नाराज कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दौंड तालुक्यातील काही प्रमुख नेते अलीकडेच अजित पवारांच्या पक्षात दाखल झाल्याने, त्यांच्या नाराजीचा फायदा घेऊन भाजप स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याच्या तयारीत आहे.

अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते निष्क्रिय झाले होते. या मरगळलेल्या संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. मुरलीधर मोहोळ आणि राहुल कुल यांच्या संयोजनातून भाजप बारामतीत स्वतःचा स्वतंत्र प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.
भाजपचा उद्देश स्पष्ट आहे. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या प्रभावाला धक्का देणे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीतील संघटनात्मक बळ वाढवणे. राज्यात महायुती असली तरी बारामतीत “दोस्तीच्या घरात कुस्ती” रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भाजपने दिलेला संदेशही ठळक आहे की, सत्ता एकत्र असली तरी राजकारण हे त्यांच्या नीतीनुसारच चालेल. येणाऱ्या काळात ही रणनीती किती प्रभावी ठरते, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.







