सांगली: मद्य प्राशन करुन परमिट रुमबारमध्ये उलटी केल्याने त्यास बारमालक व अन्य चौघांनी काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना आटपाडीत घडली. याबाबत जखमी आप्पा महादेव सरगर (वय २८, रा. करगणी, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी विक्रम गायकवाड, राम मोहिते, लखन मोहिते, गणेश उर्फ ओंकार सूर्यवंशी (सर्व रा. खरसुंडी, ता. आटपाडी) यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेची माहिती अशी की, फिर्यादी आप्पा सरगर आणि त्यांचा मावस भाऊ दत्ता कोळेकर असे दोघेजण आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सोन्या बिअरबारमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादी आप्पा सरगर यांना टेबलावरच उलटी झाली. याचा राग आल्याने बारचे मालक विक्रम गायकवाड यांनी फिर्यादी सरगर यांना शिवीगाळ केली आणि त्यांना बारच्या बाहेर हाकलून दिले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर संशयितांसह अन्य काही अनोळखी व्यक्तींनी काठ्या, लोखंडी रॉड आणि चाकूने फिर्यादी सरगर यांच्यावर हल्ला केला. यामध्ये फिर्यादी सरगर हे गंभीर जखमी झाले.