लहू चव्हाण पांचगणी ( सातारा ) : “पर्यटनाला चालना, पांचगणीचा नावलौकिक, भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेल्या पांचगणी फेस्टिवलने उंच भरारी घेतली आहे. आदर्शवत असलेल्या या सोहळ्याची परंपरा जोपासली पाहिजे” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
पांचगणी फेस्टिव्हलचे औचित्य साधून प्रसिद्ध केलेल्या ‘पांचगणी’ या स्मरणिकेचे जिल्हाधिकारी डुडी व अतिरिक्त पोलीस प्रमुख आंचल दलाल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी फेस्टिवल समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले .
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले “पांचगणीचा निसर्ग येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतो त्याला पांचगणी फेस्टिव्हलची अजोड साथ मिळाल्याने पांचगणीचा नावलौकिक अधिक वाढणार आहे. “पांचगणी फेस्टिव्हल इतरांसाठी एक आदर्शवत उपक्रम असून ही परंपरा कायम जोपासली पाहिजे. त्याचबरोबर ‘पांचगणी स्मरणिका’ विशेष क्षण आणि अद्वितीय अनुभवांची आठवण करून देण्यात मदत करते , स्मरणिका उत्तम भेट किंवा प्रवासाचा पुरावा असू शकतात, फेस्टिवल समितीने प्रसिद्ध केलेली ‘पांचगणी’ ही स्मरणिका निश्चितच पर्यटकांना पर्यटनाची एक न्यारी मेजवानी देईल. यावेळी त्यांनी स्मरणिका समितीच्या सदस्यांचा गौरव केला . आर्ट गॅलरी येथील प्रत्येक कलाकृती अप्रतिम असल्याचे उदगार त्यांनी व्यक्त केले. नितीन भिलारे यांनी त्यांना आर्ट गॅलरीच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. सचिव किरण पवार यांनी त्यांचे आभार मानले.